बाळ मोठं होतंय

५४ महिन्याचं बाळ.

 उठ बाळा, शाळेत जायचंय ना ? सॉरी ..आता बाळाला बाळ म्हटलं तर राग येतो. वयाच्या चौदाव्या वर्षी जेवढी मला इंग्लिश ची व्होकॅब्युलरी ठाऊक नव्हती त्यापेक्षा कितीतरी जास्त वय वर्षे ४ कडे आहे.

" व्हाय आर यु  कॉलिंग मी बेबी? आय एम नॉट ए बेबी!" असं दात ओठ खाऊन सांगतंय. 

ब्रश करून देऊ का असं विचारेपर्यंत अर्धा ब्रश करून झाला असतो.  

बाळ दुदु दे असं भोकाड पसरून सांगत नाही. दूध गरम होईपर्यंत शांत बसून राहतं. 

आज कोणता युनिफॉर्म घालायचा आहे हे ठाऊक असते. त्यानुसार तो गणवेश बेड वर कुठल्याशा आक्रमकतेने एका सरळ रेषेत मांडून ठेवलेला असतो. 

"आई ,मी नळ सोडू का ? मी आज माझी माझी अंघोळ करते" म्हणून अंघोळ पण करून होते. 

आवरून बाळ शाळेत जातं.आल्यावर स्वतःच्या हाताने जेवण करतं. एकचित्ताने होमवर्क पूर्ण करतं. शाळेतल्या गंमती सांगतं. 


विमान कसं झोपतं, रस्त्यावरच्या कुत्र्यांकडे बघून त्यांचं होम कुठे आहे, तू ऑफिस मध्ये काय काम करतेस असे विविध प्रश्न बाळाला पडतात. 

आईच्या तक्रारी बाबाकडे करायच्या हे आता बाळाला कळलंय. 

बाबा कडे खाऊ न मागता आईकडे लाडीकपणे मागायचा हे सुद्धा कळतंय. 

होम वर्क नाही केला तर स्क्रीन मिळणार नाही हे बरोब्बर कळलंय.  इफ कंप्लीट केला तरच लूप मध्ये शिरता येईल हे कळतंय. 

आई बाबा आपली गम्मत करतायत हे कळतंय आणि नाक फुगवून "डोन्ट मेक फन ऑफ मी" असा निषेध पण करता येतोय. 

काळाचं भान आलंय.प्रत्येक फ्रायडेला आता आई बाबांना २ डेज सुट्टी आहे हे कळून खुश होतंय. 

आई चिडली तर 'आई तू प्लीज माझ्यावर हॅपी हो' असं मनवता येतंय. 

मॉल मध्ये शॉपिंग ला जायचं म्हटल्यावर डोळ्यात चमक येतीये. 

आज आई कूकिंग करत नाहीये असं दिसलं की तू काय ऑर्डर करणारेस असा प्रश्न येतोय. 

आई बाबा दमलेले दिसले कि "आर यु टायर्ड" असं विचारात  हात पाय चेपून देतंय. 


मातीचा गोळा आता आकार घ्यायला लागलाय.खूप वेगाने. 

Comments

Popular Posts