पालकत्वाची प्रात्यक्षिके

#पालकत्वाची_प्रात्यक्षिके 

आई म्हणून रेवाशी वागण्याबद्दल अनेक प्रश्न पडतात.आपण करतोय ते किती चूक आहे किंवा किती बरोबर आहे, तिच्याशी जरा जास्तच कडक वागतोय की लाडावून ठेवलंय असे अनेक डाउट्स येतात. तेव्हा आजी-आजोबांशी बोलावं तर ते नातवंडाच्या बाजूने बायस्ड असतात असं वाटत राहतं. कारण  

"करु दे हट्ट.आत्ता  नाहीतर कधी करणार",  

"वागू दे मनासारखं",  

"बघू दे ना थोडा वेळ टी व्ही, मोबाईल.तुम्ही कामात असता,ती तरी काय करणार" अशी विधाने कानावर पडत असल्याने त्या वाटेला जायचं नसतं. मैत्रिणींना सांगावं तर त्यापण आपल्या सारख्याच  "तो /ती ऐकत नाही काय करू ?" असतात. 

मुलांशी कसं बोलायचं , कोणत्या शब्दात त्यांना समजावून सांगायचं,त्यांना नाही कसं म्हणायचं ,कधी नाही म्हणायचं, चांगल्या सवयी कशा लावायच्या इत्यादी इत्यादी  संबंधी काही पुस्तके, इन्स्टा पेजेस,फेबु पोस्ट वाचल्या कि जरा हुरूप येतो. आपल्याला जमू शकतं.आपण अगदीच "हे " नाहीये असा विश्वास  वाटायला लागतो.💪

टिप्स खरोखर चांगल्या असतात. सोप्या असतात. जसं की " मुलांना पर्याय द्या आणि निवडायला सांगा". "आज जेवणात गवारीची भाजी करू कि फ्लॉवरची?" असा प्रश्न त्यांना विचारा. ते म्हणतील ते करा. आपल्या म्हणण्याला किंमत आहे असं त्यांना वाटुदे.  पण तुम्हाला जे त्यांना खायला घालायचं आहे गवार,कारले,शेपू इत्यादी तेच पर्याय द्या. 🤪

"त्यांच्या आवडीचा पदार्थ त्यांना बक्षीस म्हणून द्या". खेळण्यांचा पसारा आवरला, जेवण पूर्ण संपवलं असं काही केलं तरच त्यांना आवडीचा खाऊ द्यायचा. 

"टीव्ही,मोबाईल बघण्याची वेळ आणि किती वेळ बघायचं ते ठरवून घ्या आणि तेव्हाच त्यांना द्या".मुलांना रुटीन कळलं की त्या वेळेच्या आधी टीव्ही लाव,मोबाईल दे म्हणणार नाहीत. 

'नो मीन्स नो' हे त्यांना कळूदे. "अमुक वस्तू आत्ता मिळणार नाही ह्यावर तुम्ही ठाम राहा." घेऊया पण लगेच नाही असं सांगा. मुलं रडतील,ओरडतील.  तुम्ही ठाम राहा. 'हट्ट केला कि मिळतं' हा मेसेज तुमच्या वागण्यातून देऊ नका.❌

हा झाला आदर्शवाद!!

आता वास्तववाद!! 

"आज रेवाला आई अंघोळ घालूदे कि बाबा?" ह्या प्रश्नात रेवाला एक छुपा तिसरा पर्याय दिसतो."कोणीच नको" असं म्हणून ती रिकामी होते. 😫

"ही खेळणी आवरून ठेव मग बक्षीस म्हणून श्रीखंडाची गोळी देणारे" असं आपण म्हणलं की रेवा सुद्धा वाटाघाटीच्या मोड मध्ये शिरते. 😨

"तू आधी गोळी दे मग आवरते", 

"एक नाही दोन गोळ्या हव्या आहेत" , 

" तू मला मदत कर ना मग मी पण एक गोळी तुला देईन". असं म्हणते. 

नेमका कॉल चालू असेल तेव्हा आई मला यूट्यूब लावून दे असं म्हणणार.आपण ठाम राहून 'नाही ' म्हणूच शकत नाही. इथे तिची रडारड परवडण्यासारखी नसते. मुकाट यूट्यूब लावून द्यावं लागतं.🤐  

"आत्ता केक मिळणार नाहीए" असं म्हटल्यावर ती रडत नाही पण हिरमुसते. तो चेहरा बघून ह्याच्याशी कसं डील करायचं हे कुठे लिहलेलं नसतं.😔 

त्यामुळे "आदर्श वास्तव वाद"  हा नवा  मार्ग स्वीकारावा लागतो. 

एखाद दिवस सकाळी तिला अंघोळ नाही घातली नाही तर काही होत नाही, दुपारी घालायची. 

आवरतीये ना पसारा मग आधीच गोळीचं  बक्षीस द्यायचं. 

यूट्यूब लावायला नाही न म्हणता वायफाय ची केबल काढून ठेवायची. नेट गेलंय असं तिला सांगायचं. 

असे मधले मार्ग निवडायला लागतात. 

 ती म्हणतीये तो केक तिला घेऊन द्यायचा. 

सम्यक मार्ग. फार कडक शिस्त नाही आणि फार लाडही नाहीत. 

दिवसभर छान खेळली की रात्री मी तिला हक्काचा स्क्रीन टाइम द्यायचा . 

जेवण व्यवस्थित जेवली की न विसरता तिचा खाऊ द्यायचा. 

कधी काहीही कारण नसताना तिला पेस्ट्री आणायची. 

तेव्हा तिच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद बघून " जास्त गोड खाऊन दात किडतील" ही काळजी क्षुल्लक वाटायला लागते.❤️😘 

पुस्तकी ज्ञान आणि प्रात्यक्षिक ह्यात किती फरक असतो हे पाहून थक्क व्हायची वेळ शाळेतल्या प्रयोगशाळेपासून,कोडींग करताना ते मुलाला  वाढवताना अशी असंख्य वेळा येत असते.😅😁

Comments

Popular Posts