पत्ता

ऍमेझॉन ची डिलिव्हरी अप्रूव्ह करायला रात्री ९ वाजता फोन किणकिणला.ऑर्डर-एक्सचेंज-रिटर्न ह्या चक्रामध्ये बऱ्याच गोष्टी फिरत असल्याने आत्ता काय येणार होतं ह्याचं गणित जुळत नव्हतं. असेल काहीतरी म्हणून एन्ट्री अप्रूव्ह केली.आट्याची पिशवी आणि पिशवीच्या उंचीचा पॉंड्सचा डबा घेऊन दारात उभ्या असलेल्या माणसाला बघून मी बुचकळ्यात पडले.

"हमारा नही है वो, दुसरे ब्लॉक से होगा." मी. 

'मला वाचता येत नाही असं वाटतं कि काय ह्या बाईला' असं तोंड करून त्याने त्याच्याकडचा पत्ता दाखवला.झोपेत ऑर्डर केली होती की काय (अगदीच शक्य आहे ) असा विचार मनात येऊन गेला. 

पत्ता अचूक होता. 

नाव वाचून त्याला सांगितलं, माजी भाडेकरूची ऑर्डर आहे. "वो इधर नही रहते". 

फोनाफोनी करून वैतागत तो निघून गेला. 

वेगवेगळ्या लोकांना किती तर्हेने पत्ता समजवायला लागतो.. 

"मेन गेट से आना.. पिछे के गेट से मत आना. एन्ट्री नाही देगा वॉचमन. एन्ट्री के बाद तुरंत दाये मुडना है फिर गेस्ट पार्किंग के इधर रुकना. " घराला कुलूप लावता लावता कॅब वाल्याला सांगितलेला पत्ता. 

"मेन रोड पे पान का शॉप है, उधर से टर्न लेना", असा स्वीगी वाल्याला सांगितलेला पत्ता.तरी पण तो भलत्याच गल्लीत वळायचा. 

परत तिथून "वो फिश टॅंक का दुकान है ना वहा से राईट लेके सिधा आना, फिर एक कॅफे है ,उधर जोर से गाना चालू रहेगा वहा से पहला लेफ्ट लेके आना." असं सांगत योग्य पत्त्यावर आणायचं. 

मग फ्लाय ओव्हर च्या खांबाचा नंबर सांगून तिथे वळायचं असं सांगायला लागले. ते परफेक्ट जमलं होतं.पत्ता चुकायचा प्रश्न नाही. जास्त फोनाफोनी न होता आणि वाट्टेल त्या खुणा न सांगता धडाधड ऑर्डर येत आहेत हे कोणाला(?) बघवलं नाही आणि फ्लाय ओव्हर चे खांब वेगवेगळ्या प्राण्याच्या चित्राने रंगवले गेले. त्या झू मध्ये खांबांचे क्रमांक लपले गेले. हाय रे.. आता हा ऑर्डर देणारा मनुष्यप्राणी कसा यायचा. 

दिवसभर WFH मुळे कॉल्स चालू असतात .त्यात "पत्ता सांगा" हा कॉल पण यायला लागला. 

एकदा एक कॅब वाला भलतीच वळणे घेत चुकत माकत अखेर योग्य रस्त्याला लागून घरा पर्यंत आला. 

"मॅडम, 'सुनील वाईन्स'  के अपोसिट टर्न लेना है इतना बताया होता तो तुरंत पता चल जाता."

बिंगो . 

तेव्हापासून "सुनील वाईन्स" अशी ठशठशीत खूण सांगून ऍमेझॉन, स्वीगी ,कॅबवाले अचूक यायला लागले.

दारूचा हा कदाचित एकमेव फायदा. 

दारूच्या दुकानाच्या रेफरन्स ने पत्ता सांगायचा.हुकमी खूण आहे. 


आम्ही एके काळी नाव नसलेल्या बिल्डिंग मध्ये राहायचो.समोर ,बाजूला इमारती नव्हत्या. तेव्हा डिलिव्हरी देणाऱ्या माणसाला "वो मेन्स सलोन है वहासे सीधा आना और पार्किंग में रेड कलर की पुरानी कार है वो बिल्डिंग में फर्स्ट फ्लोर पे आना है" असा पत्ता सांगायला लागायचा. काही ऑर्डर्स नंतर एकदा कळलं की पार्किंग मध्ये रेड कार खूप कॉमन आहे. मग बाल्कनी मधून हात हलवत " उपर देखो " म्हणत ऑर्डर यायला लागली. 

पत्ते सांगायचे अनेक प्रकार आहे. 

इथून 3०० मीटर सरळ गेलीस कि उजवीकडे वळायचं असा पत्ता सांगणार्यांना नेमक्या 3०० मीटर चा कसा अंदाज असू शकतो असं वाटतं.१०० मीटर धावायची स्पर्धा ह्या नंतर मीटर हे प्रमाण वापरल्याचं आठवत नाही. 

वरच्या अंगाला , खालच्या अंगाला हे केवळ चित्रपटात नव्हे तर प्रत्यक्ष सांगणारे लोकं आहेत. त्या ही पुढे जाऊन खायच्या-धुवायच्या अशा प्रकारे दिशा सांगणारे लोकं असतील ह्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. 

आंब्याचं झाड, पाण्याची मोठी टाकी, तमुक ज्वेलर च दुकान,डेड एन्ड ला वळा अश्या ठळक खुणा आणि योग्य सूचनांद्वारे अचूक पत्ता सांगणारे दुर्मिळ असतात. 

ह्या पत्ते पे पत्त्याने मला काही धडे दिले आहेत. 

एकदा मी स्वीगी वरून ऑर्डर दिली आणि वाट बघत असताना डिजिटल क्लटर-मारी कोंडोचा किडा अंगात शिरला.'आपल्या ऍप मध्ये फारच पत्ते झालेत जरा क्लिअर करूया'  म्हणत मी जुना पत्ता डिलीट केला. तर कसं कोण जाणे सेव्ह असलेला दुसराच पत्ता माझ्या ऑर्डर ला घेतला आणि पुढच्या पंधरा मिनिटात २० किमी लांब रेल्वे स्टेशन वरून बिचारा स्वीगी वाला मला कॉल करत होता. (मागच्या वेळेस रेल्वेत बसायच्या आधी पार्सल ऑर्डर केलं होतं .. इंडेक्सिन्ग नि ऍड्रेस assign होतात कि काय )

"एवढ्या वेळात मुगाची  खिचडी करून खाऊन सुद्धा झाली असती " हे वाक्य दुर्लक्षून पुन्हा ऑर्डर केली. ऑर्डर दिली असताना ऍप मध्ये काहीही उपडेट करायचं नाही हा अमुल्य धडा शिकले. 

स्वीगीच्या QA लोकांनी  ऍप नीट टेस्ट केलं नाहीये हे कळलं आणि  तेव्हापासून एखादा scenario discuss करताना हि कॉर्नर केस आहे ,असं कोण करणारे असा विचार न करता Extensive Testing आणि सगळे scenarios कव्हर करणाऱ्या टेस्टर्स ना मी मनापासून वंदन करते.

ऍमस्टरडॅम मध्ये फिरत असताना गूगल मॅप्स बघून तंतोतंत चालत जाऊन देखील हिऱ्याच्या म्युझिअम ऐवजी भलत्याच (अगदीच भलत्या !) ठिकाणी पोहाचलो होतो तेव्हापासून नवऱ्याचा माझ्या नकाशा वाचना वरचा विश्वास उडला आणि गूगल मॅप्स सगळं योग्य सांगत नाही हा धडा मला मिळाला.

"पत्ता सांगणे" हे पासष्ठाव्या कलेत समाविष्ट करायला हवं!! 

Comments

Post a Comment

Popular Posts