फायर ड्रील
आता WFH करणं ओल्ड नॉर्मल झालंय.ऑफिसची खुर्ची,टेबलं,चहा,कॉफी,लिफ्ट काय वाट्टेल ते मिस करत असले तरी सगळ्यात जास्त 'फायर ड्रील' मिस करतेय.
हा वर्षातून दोनदा तरी होणारा कार्यक्रम.
आणि हे होतं ते पण अगदी मुहूर्तावर.ज्या दिवशी रिलिज असतं,खूप काम राहिलेलं असतं, नेमकं रिव्यू च्या आधी बिल्ड फाटत असतं, बगफिक्स वर काम करत असताना अगदी युरेका झालेलं असतं,
तेव्हाच नेमका फायर अलार्म वाजतो.
एरवी बाहेर वादळ ,वारा ,पाऊस,गारा,भूकंप,प्रलय काहीही होत असलं तरी खुर्चीत बसून दाणदाण कीबोर्ड् वाजवत कोड करणारे आम्ही आजूबाजूला मान फिरवतो. 'आजच बरा मुहूर्त सापडला ड्रील साठी' असे भाव
७०% जनतेच्या तोंडावर असतात. मागच्या ड्रीलवेळी झालेली सूचना आठवते. "आहात तसं उठून खाली जायचं.." आम्ही नवखे असताना कोड कंपाइल होईस्तोवर थांबून राहिलो होतो. कोड कमिट करून ,जाता जाता मशीन ची कॉफी घेऊन,लिपबाम आणि काजळ लावायचं म्हणून वॉशरूम मध्ये जाऊन मग जिना उतरणारी जनता होती. लोकांना इमरजेंसी जिना कुठे आहे हे माहित नाही म्हणल्यावर ड्रिलवाले हुकलेच होते.'खरंच आग लागली तर काय होईल' ह्याच टेन्शन ड्रिलवाल्या मंडळींना आलं होतं.
ते सगळं आठवून आम्ही लगेच उठतो. जाता जाता लॅपटॉप लॉक करून जाणं फिट्ट झालंय .त्यामुळे स्वतःच्याही नकळत लॅपटॉप लॉक करूनच उठतो.
आजूबाजूच्या लोकांना 'चला चला' म्हणून हाका मारतो. एक दोन जास्त जबाबदारी असलेले लोक खुर्चीला चिकटून बसलेले असतात.हेडफोन्स घालून गाणी ऐकत काम करणारे वेगळ्याच जगात असतात.आजूबाजू काय चाललंय हे त्यांच्या गावी नसतं.त्यांना जाऊन उठवायचं. वाट्टेल ते झालं तरी आपली पेस न बदलता वागायची कला काहीजणांना अवगत असते.क्लीकक्लीकाट करून निवांत उठायचं, हात मागे घेऊन स्ट्रेच करायचे, मोबाइलला घेतलाय ना,रुमाल घेतलाय ना हे तपासून मग जिन्याकडे जायचं.
एव्हाना जिन्यात गर्दी झालेली असते. जिन्याकडे जायचं दार छोटं असतं (की आम्ही बसून बसून पोलर बेअर झालेलो असतो ?)
एव्हाना 'जागेवरून लवकर उठलो' हीच अचिव्हमेंट वाटत असल्याने जिन्यात पब्लिक निवांत झालेलं असतं. ६ जिने उतरून जायचे असतात.
टापटाप टिकटिक आवाज करत जिना उतरताना एखादी फोनवर नाजूक आवाजात बोलत असते, काहींचं ड्रील झालं की नंतर आईस क्रीम खायचं हे ठरत असतं, कोणी 'आता आज घरी जायला उशीर होणार' म्हणून चुट्पुटत असतं. तेवढ्यात कोणालातरी आठवतं "अगं वरच्या फ्लोअर वरची ती प्रेग्नन्ट आहे, जिने कशी उतरणार एवढे?"."तिला आधी सांगितलं असेल, की ड्रील आहे. तू येऊ नको खाली" असे संवाद होईस्तोवर सर्वजण खाली येतात.
मग ड्रिलवाले काका नेहमीच ठरलेलं भाषण देतात.आग लावून सिलिंडरने विझवायला कोणीतरी या असं सांगतात.नेहमी तत्कालीन फ्रेशर्सची नावं कोणीतरी प्रॉम्प्ट करतं. मग ते आग विझवतात.
मग पांगापांग होते. काही जण आईस-क्रिमच्या दुकानाकडे रवाना होतात. काही चहा प्यायला जातात.दूरदृष्टी असलेल्या काही चतुर मंडळींनी आधीच जाऊन लिफ्ट पकडलेली असते.लिफ्टची कुठे वाट पहा म्हणून बहुसंख्य जनता मुख्य जिन्याने हाश हूश करत जायला लागते, 'पुढच्या वेळी तरी चांगल्या दिवशी ड्रील असुदे' अशी आशा बाळगून.
Comments
Post a Comment