टिकली
मला टिकली लावायची मनापासून नावड आहे. कारण एकच .
मला टिकली चांगली दिसत नाही.
किती सोप्पं आहे हे.
सातवी पर्यंत माझ्यात आणि टिकलीत कोणताच वैर नव्हतं.
माझी शाळा 'जैन कन्या प्रशाला' सर्वार्थाने संस्कारी शाळा होती.गणवेश,सॉक्स ,बूट,वेण्या,रिबिनचा रंग यासोबत गंध /टिकली सुद्धा तपासली जायची. शाळेत टिकली संबंधी उपनियम असायचे.टिकली शक्यतो लाल असावी. ती लावायची जागा सुद्धा सांगितली जायची. भुवयांच्या मध्ये न लावता थोडी वर लावायची.त्या अर्ध्या सेंटीमीटरने असा काय फरक पडणार होता.पण तशी लावल्यावर चेहरा अजून छान दिसतोय असं वाटायचं.
सातवी-आठवी नंतर माझ्या मनात टिकलीबद्दल प्रश्न येऊ लागले. मला टिकली लावलेली छान दिसत नाही ह्या साक्षात्काराला माझ्या मैत्रिणीचं अनुमोदन मिळालं.टिकली लावणे म्हणजे शिक्षा वाटायला लागली. शाळेतून आल्या आल्या आधी मी टिकली काढून टाकायचे. नागपंचमीला देवांच्या वाड्यात खेळायला जाताना, कुठे हळदी-कुंकवाला जाताना बाकी मी अगदी नखशिखांत नटलेली का असेना पण टिकली लावली नाही की आजीच्या कपाळावर आठी उमटायची. आई आणि आजीची 'टिकली लाव ' अशी आदेश वजा सूचना यायची. त्याला विरोध केला कि तो घरात अचानक हिंदुत्वाचा मुद्दा बनायचा आणि टिकली प्रकरण थेट बाबांकडे जायचं. मग मी चरफडत सुईच्या टोकापेक्षा थोडी मोठी फिकट चंदेरी टिकली कपाळावर टेकवायचे. मग ती दिसत नाही म्हणून घरात पुन्हा कुरकुर चालू व्हायची. 'तुम्ही टिकली लावायला सांगितलं आणि मी लावली' असं सांगून मी पळायचे.
पुढेे कॉलेज ,परीक्षा,शिक्षण वैगरे बिंदू जोडण्याच्या गराड्यात टिकलीचा मुद्दा टिकली एवढाच बनून राहिला.पण साडीवर,सणावारी टिकली सूट होते म्हणून तेवढ्या पुरती कपाळावर हजर आणि नंतर तत्परतेने गैरहजर व्हायची. छान चाललं होतं.
लग्न ठरल्यानंतर आईने दिलेल्या अनेक सूचनांपैकी एक सूचना 'लग्नानंतर तरी टिकली लावत जा' अशी होती.
त्यावर ‘जीव लावणं महत्वाचं’! टिकलीचा काय संबंध !' असं न बोलता गप्प
नव्या नवलाईचे ९ दिवस सरल्यावर मी पुन्हा माझ्या टिकली विरहित कपाळावर परत आले. मग 'तू टिकली लावल्यावर सुंदर दिसतेस' असं नवऱ्याने गोडपणे सांगितल्यावर माझ्या निर्धाराला तडा गेला.पण टिकली लावलेली मी मलाच आवडत नाही ह्या सत्याने त्यावर मात केली. एखाद्या प्रसंगी मी टिकली लावल्याने बदललेला त्याचा चेहरा पाहून तेव्हा त्याने किती मनापासून सांगितलं होतं हे जाणवतं ..पण ..असो.
टिकलीी लावणाऱ्या बायकांबद्दल मला खूप कौतुक वाटतं!विविध रंगाच्या,उभ्या,आडव्या,लंबगोल,गोल,चंद्रकोर,सोन्याच्या ,खड्याच्या टिकल्यांचं त्यांचं कलेक्शन बघून मी हरखून जाते. नेमाने टिकली लावणाऱ्या बायका कधी टिकली पडून गेली,लावायची राहिली तर 'टिकली नसल्याचं लक्षात कसं आलं नाही माझ्या 'असं चुटपुटत नवीन टिकली लावतात तेव्हा त्यांच्या टिकली प्रेमाचं कौतुक वाटतं .
कुंकू /टिकली म्हणजे सौभाग्याचं दर्शक असं म्हणतात.
टिकली लावा किंवा लावू नका, सौभाग्य आपल्याला खरोखर लाभलंय कि नाही हे प्रत्येकीला पक्कं ठाऊक असतं.!
Mast
ReplyDeleteThanks..
Delete👍👏😂 Avadla
ReplyDeleteThanks.😄
Deletebhari
ReplyDeleteएका मुलीचे "टिकली मत" छान लिहिले आहेस ..
ReplyDeleteधन्यवाद..
Deleteटिकली हे सौभाग्य अलंकारच तो ल्यायचा की नाही हाही ज्याच्या त्याच्या आवडीचाच भाग.
ReplyDeleteटिकली हे सौभाग्य अलंकारच तो ल्यायचा की नाही हाही ज्याच्या त्याच्या आवडीचाच भाग.
ReplyDeleteहो आणि ते तसंच असायला हवं😄
Delete